। रसायनी । वार्ताहर ।
विद्याप्रसारिणी सभा चौक संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख अतिथी, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व प्रशिक्षक विश्वनाथ रामचंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी क्रीडा शिक्षक शरद कुंभार यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्रीडा क्षेत्रात आपल्या शाळेतील खेळाडू विद्यार्थी हे तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावर चमकदार कामगिरी करत असून शाळेचे नाव उंचावत आहेत. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी. म्हणूनच आपण जाहीरपणे क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ घेत आहोत, असे सांगितले. यावेळी, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अतिशय दिमाखदार पद्धतीने विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना सन्मानित करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच, उत्कृष्ट खेळाडू ऋषी जोमा भस्मा व दीपिका जयवंत डुकरे यांचे विशेष कौतुक करत दोन्ही चॅम्पियन खेळाडूंना वैयक्तिक 500 रुपयाचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख, शोभाताई देशमुख, मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड, दिनेश पाटील, पुजारी, मोळीक, कांबळे, सुवर्णा मोरे, व विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.







