। चिरनेर । प्रतिनिधी ।
चिरनेर येथील श्रावणी किरण केणी हिने शनिवारी (दि.21) अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. ती या स्पर्धेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून तिची निवड अमरावती येथे होणार्या राज्यस्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.
दरम्यान, यावर्षी झालेल्या सीबीएससी बोर्डाच्या चॅम्पियनशिपमध्येही श्रावणी केणी हिने महाराष्ट्र आणि गोवा विभागात 400 आणि 800 मीटर अशा दोन्ही स्पर्धेत सुयश प्राप्त करून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. तर, वाराणसी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 400 व 800 मीटर या दोन्ही स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून, देशात तिने पाचव्या क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळविला आहे. याआधी पनवेल मॅरेथॉन, फुंडे मॅरेथॉन, खारघर मॅरेथॉन, नेरळ मॅरेथॉन येथील स्पर्धेत सहभाग नोंदवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. विशेषता: प्रशिक्षक स्नेहल पाटील आणि अनिल कुमार यांनी घेतलेला सराव आणि तिच्या मेहनतीमुळे श्रावणीला हे यश प्राप्त झाल्याचे वडील तथा ग्रामविकास अधिकारी किरण केणी यांनी सांगितले आहे.