विकासाच्या नावाखाली अस्तित्वावरच घाला
संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्याच्या विकासाची गगनभेदी घोषणाबाजी सुरू असली, तरी प्रत्यक्षात हा विकास उरणला समृद्ध करण्यासाठी की उरणला बुडवण्यासाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत विकासाच्या नावाखाली झालेल्या भरावांनी, अनियंत्रित बांधकामांनी आणि नैसर्गिक जलमार्गांच्या झालेल्या कत्तलीने उरणच्या अस्तित्वालाच धोका निर्माण केला आहे. त्यामुळे उरणमध्ये होणारा गगनभेदी विकास हा विकास नसून उरणकरांसाठी श्राप असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे.
उरण तालुका हा समुद्रकिनारी वसलेला भाग आहे. पूर्वी मुसळधार पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा नैसर्गिक नाले, खाड्या, ओढे आणि मोकळ्या जागांमधून होत असे. मात्र, आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विकासाच्या नावाखाली समुद्रात भराव टाकून प्रकल्प उभे राहिले, खाड्यांवर अतिक्रमण झाले, शेतजमिनी बुजवून बेकायदेशीर यार्ड्स आणि वसाहती उभ्या राहिल्या. परिणामी पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद झाल्या आहेत. जेएनपीए, विविध बंदर प्रकल्प, साडेबारा टक्के भूखंडांसाठी सुरू असलेले भराव, औद्योगिक कंपन्यांची वाढ, मोठमोठ्या गृहनिर्माण योजना आणि अनधिकृत यार्ड्स यामुळे संपूर्ण भौगोलिक रचनाच बदलून गेली आहे. ज्या जमिनी पावसाचे पाणी शोषून घेत होत्या, त्या आज सिमेंट-काँक्रीटखाली गाडल्या गेल्या आहेत. परिणामी पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे पाणी आता नागरिकांच्या घरांकडे धाव घेणार आहे. विशेष म्हणजे अनेक गावांच्या भोवतीचा भराव हा गावांच्या उंचीपेक्षा जास्त झाला असून, धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडल्यास पाणी थेट घरांमध्ये, शाळांमध्ये, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उरण शहरासह चाणजे, दास्तान, जासई, करंजा, खोपटा, पागोटे, धुतूम, नवघर, कुंडेगाव, नवीन शेवा, भेंडखळ,जसखार, सोनारी, करळ, सावरखार, चिरनेर, वेश्वी, दादरपाडा, कोप्रोली, वशेणी आणि इतर अनेक गावांमध्ये नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. अनेक ठिकाणी नाले साफ झालेले नाहीत. काही ठिकाणी नाल्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. तर काही ठिकाणी बांधकामांच्या भरावाखाली नाले गाडले गेल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यावर्षी हवामान खात्यानेही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यातच येत्या काही दिवसांत मान्सून उरण परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. अशावेळी जर रात्रीच्या वेळी मुसळधार पाऊस आणि समुद्रातील मोठी भरती यांचा संगम झाला तर परिस्थिती अत्यंत भयावह होऊ शकते. पावसाचे पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद आणि समुद्राचे पाणी आत येण्याचा धोका वाढल्यास अनेक वस्त्या जलमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने नालेसफाई, जलमार्ग मोकळे करणे, धोकादायक भरावांची चौकशी, पूरनियंत्रण आराखडा जाहीर करणे आणि संवेदनशील गावांसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यंदाच्या पावसात उरण वाचणार की विकासाच्या नावाखाली उरणला कायमचे बुडवले जाणार? असा प्रश्न सध्या उरणकरांच्या मनात घोंघावत आहे.
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हत्या
स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कोट्यवधी रुपयांची कामे दाखवली जातात; परंतु, प्रत्यक्षात मात्र पावसाच्या पहिल्याच सरीत पाणी साचते. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक पर्यावरणाची हत्या करून आता त्याची किंमत सर्वसामान्य उरणकरांना मोजावी लागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनीही याबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, समुद्रकिनारी असलेल्या भागात अनियंत्रित भराव आणि जलमार्गांचे अतिक्रमण ही भविष्यातील महापूराची नांदी ठरू शकते. आज जर यावर कठोर निर्णय घेतले नाहीत, तर उद्या संपूर्ण उरण तालुक्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते.





