| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहे. अनेक पालकांनी कुरुळ येथील आरसीएफच्या शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले आहे. मात्र आरसीएफ शाळेची ही इमारत वापरण्याचा डेक्कन एज्युकेशन संस्थेला तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापुर्वी माहिती करून घ्यावी, असे आरसीएफ प्रशासनाने पत्र पालकांना दिले आहे. आरसीएफ प्रशासनाच्या पत्रानंतर पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शिक्षण विभाग काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कुरूळ येथील आरसीएफ शाळा, ही स्थापनेपासून पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी, या शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापना अंतर्गत चालवली जात होती. परंतु संस्थेकडून ही शाळा चालवण्यास जून 2024 पासून नकार देण्यात आला असल्याचा आरोप आरसीएफने केला आहे. या संस्थेला शाळा सुरू ठेवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र संस्थेने ते आदेश मानण्यास स्पष्ट नकार देऊन जून 2024 पासून आपल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी देखील नाकारली. केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आरसीएफ व्यवस्थापनाने शाळेची इमारत व परिसर वापरण्यास हरकत घेतली नव्हती. परंतु दोन शैक्षणिक वर्षे पूर्ण होऊन देखील डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेला शिक्षण विभाग परत आणू शकले नाही. संस्थेने स्पष्ट केले आहे की शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे त्यांचे कर्मचारी नाहीत. त्यामुळे कोणतीही लेखी परवानगी नसताना, शाळेतील कर्मचारी संस्थेचे नाव वापरुन नवीन प्रवेश घेत आहेत.
आरसीएफ व्यवस्थापनाने गेल्या 2 वर्षांत शाळेचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार भारतातील नामवंत संस्थेची निवड करण्यात आली होती. तांत्रिक कारणामुळे शिक्षण विभागाला शाळेचे हस्तांतरण नवीन संस्थेकडे करता येत नसल्याने उच्च न्यायालयात आरसीएफ तर्फे याचिका देखील दाखल करण्यात आली. परंतु शाळा यापुढे सुरळीत चालू राहील असे यश आरसीएफ व्यवस्थापनाच्या प्रयत्नांना मिळाले नाही.आरसीएफ शाळा, ही पूर्णपणे खासगी विना अनुदानित असून तिची मान्यता डेक्कन एज्युकेशन सोसायटी,फ या संस्थेच्या नावे आहे, संस्थेने शाळा व्यवस्थापनास नकार दिला असल्याने शाळेची इमारत वापरण्याचा संस्थेस तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणताही अधिकार नाही, असे आरसीएफ प्रशासनाने पत्र दिले आहे. आरसीएफच्या पत्रानंतर पालक वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरु होण्यासाठी तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. आरसीएफच्या पत्रानंतर विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची चर्चा सुरु आहे. काही पालकांनी विद्यार्थ्यांचे नाव काढून अन्य शाळेत टाकले आहे. काही पालकांचे आरसीएफच्याच शाळेत प्रवेश घेतले आहे. शिक्षण विभागाच्या संचालकांकडून येणाऱ्या पत्रानंतरच शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आरसीएफ खासगी विना अनुदानित असून तिची मान्यता डेक्कन एज्युकेशन सोसायटी, या संस्थेच्या नावे आहे, संस्थेने शाळा व्यवस्थापनास नकार दिला असल्याने शाळेची इमारत वापरण्याचा संस्थेस तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणताही अधिकार नाही. आरसीएफ शाळा प्रवेश घेण्यापुर्वी पुर्ण माहिती करून घ्यावी. जेणेकरून पाल्यांचे हित सुरक्षित राहिल.
– महेश पाटील, मुख्य प्रशासकीय व्यवस्थापक
आरसीएफ शाळा ही कंपनीच्या मालकीच्या जागेत असली, शाळा सुरु राहणार आहे. एका शिक्षण संस्थेचे कर्मचारी या शाळेमध्ये आहेत. पुणे येथे झालेल्या सुनावणीमध्ये संचालकांनी शाळा सुरु ठेवण्यास सांगितले आहे. लवकरच त्यांच्याकडून पत्र प्राप्त होईल.
– महारुद्र नाले, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग




