पाली भुतवलीच्या मानेवर सरकारी भूत
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधलेले पाली भुतीवली धरण स्थानिक शेतकर्यांच्या कोणत्याही फायद्याचे ठरलेले नाही. धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी बांधण्यात येणारे 15 किलोमीटर लांबीचे कालवे बांधून झालेले नाहीत. दरम्यान, कालवे बांधण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात पाटबंधारे विभाग उदासीन असल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकर्यांची मागणी असून देखील कालवे बांधले नसल्याने 1100 हेक्टर जमीन मागील 20 वर्षात ओलिताखाली येऊ शकली नाही.
कर्जत तालुक्यातील पाली भुतीवली येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला 1998 मध्ये सुरुवात झाली आणि धरणाच्या मुख्य जलाशयात 2004 मध्ये पाणी साठा झाला. कोणत्याही धरणाची निर्मिती होत असताना धरणाच्या एकूण कालव्यांच्या 25 टक्के कालव्यांची कामे मुख्य बांधाचे काम पूर्ण होत असताना पूर्ण करण्याचे बंधनकारक असते. त्याचे कारण धरणातील पाणी कालव्यांच्या माध्यमातून जमीन ओलिताखाली आणण्यासाठी उपयोगात आणले जाते. मात्र पाली भुतीवली धरणाच्या मुख्य 2004 मध्ये पाणी साठा होत असताना कालव्यांची कामे बांधण्यात आली नव्हती. 2004 मध्ये धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, यासाठी किमान साडेचार किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण व्हायला हवे होते. मात्र आज 20 वर्षातदेखील पाली भुतिवली धरणाचे पाच किलोमीटर लांबीचे कालवे बांधून पूर्ण झालेले नाहीत.
पाली भुतीवली धरण पाणीटंचाई दूर करण्यासाठी, शेतीसाठी, जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आले. मात्र पाटबंधारे खात्याने कालवे बांधण्यासाठी त्या-त्या भागातील कालव्यांच्या मार्गातील शेतकर्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्याची कार्यवाही केली नाही. या धरणातील पाणी मुख्य विहिरीमधून कालव्यात सोडताना मुख्य कालवा एक किलोमीटर लांबीचा खोदण्यात येणार होता. त्यानंतर उजवा आणि डावा असे अन्य कालवे खोदण्याचे नियोजन धरणाचे काम सुरू होत असताना पाटबंधारे विभागाने केले होते.त्यात उजवा कालवा हा चार किलोमीटर लांबीचा तर डावा कालवा हा 10 किलोमीटर लांबीचा बांधण्यात येणार होता. मात्र यापैकी कोणत्याही कालव्यांचे काम पाटबंधारे विभागाने केले नाही. धरणाचे काम 30 वर्षे होऊनही पूर्ण होऊ शकले नाही.
कालव्यांची लांबी
एकूण 15 किलोमीटर
उजवा कालवा 4 किलोमीटर
डावा कालवा 10 किलोमीटर
मुख्य कालवा 1 किलोमीटर
ओलिताखाली येणारी गावे
भुतीवली, आसल, आसलपाडा, वडवली, माणगाव, बेकरे, एकसळ,
आंबिवली, चिंचवली, गारपोली, डिकसळ, वावे, बार्डी, उमरोली, आषणे, कोषाणे आणि सावरगाव
कालव्यांच्या मार्गात बांधकामे
पाली भुतीवली धरणाचे पाणी ज्या कालव्यातून सोडले जाणार आहे. त्या मार्गाचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याचवेळी मार्गदेखील निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर देखील कालव्यांच्या मार्गावर बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे कालव्यांच्या बांधकाम करण्यावर बंधने येऊ शकतात. परिणामी, 1998 मध्ये कालवे प्रस्तावित असताना कालव्यांच्या मार्गावर बांधकामांना परवानगी देणार्या संस्थांवर शासन कारवाई करणार का?
कालव्यांच्या काही जमीनींपैकी काही ठिकाणी वन जमीन अंतर्गत भाग येत असल्याने वन विभागाच्या परवानगीसाठी प्रस्ताव केले आहेत. तर खासगी जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहेत.
एस.डी.शिंदे,
उपअभियंता, पाटबंधारे विभाग
आम्ही शेतकरी गेल्या 20 वर्षापासून उन्हाळी शेती करण्यासाठी पाण्याची वाट पाहत आहोत. भातशेती करून येथील शेतकरी सधन होईल म्हणून आम्ही प्रकल्पग्रस्त संघर्ष करीत आहोत. शेतीसाठी पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आता तरुण शेतकर्यांनी पुन्हा एकदा चळवळ सुरू केली आहे आणि तरुणांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल.
आत्माराम पवार,
शेतकरी






