। पनवेल । वार्ताहर ।
लहानपणापासूनच एखादी जिद्द आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कशी पोहोचवू शकते, याचे द्योतक उदाहरण नवीन पनवेल येथील कुणाल प्रमिला सिद्धार्थ खरात याने समोर ठेवले आहे. कुणाल याने आपल्या जिद्दीच्या जोरावर चार्टर्ड अकाउंटंट्सच्या (सीए) नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशानंतर परिसरातील नागरिकांनी कुणाल याला भेटून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कुणाल याला लहानपणापासूनच सीए बनण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगितली होती. घरातील संस्कार आणि कुणालची जिद्द त्याला सीएच्या पदापर्यंत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. कुणालने आपली जिद्द खरी करण्यासाठी त्याने आपल्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यानच सीएच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरु केली होती. पदवीपर्यंतच्या शिक्षणामध्ये तो साईटीची परीक्षा देऊन उत्तीर्णदेखील झाला. यानंतर त्याने पोतदार महाविद्यालयातील आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आणि 3 वर्षांसाठी नवीन पनवेल येथील जैन अँड सन्स या फर्ममध्ये त्याने प्रशिक्षण (एंटरशिप) घेतले.