| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरात नगरपरिषदेने बसवलेल्या ई-टॉयलेटमध्ये दुसऱ्यांदा पर्यटक अडकण्याची घटना घडली आहे. या घटनेने ई-टॉयलेटबद्दल संभ्रम निर्माण झाला असून, पर्यटक आणि स्थानिकदेखील घाबरले आहेत. नगरपरिषदेने ही ई-टॉयलेट 37 लाख रुपये रकमेने खरेदी केली असून, गेली काही महिने निर्माण झालेला पालिकेच्या कारभाराबद्दल संभ्रम आणखी वाढला आहे.
माथेरानमध्ये प्रशासकीय काळात नगरपरिषदेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाजारभावापेक्षा जास्त 38 लाख 70 हजार रुपयाला ई-टायलेट खरेदी केले. त्यामुळे या प्रकियेत मोठ्या प्रमाणात भष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी माथेरानमधील एको पॉईट येथील ई-टॉयलेटमध्ये एक महिला पर्यटक अडकल्याची घटना घडली होती. ही महिला ई-टॉयलेटच्या आतमध्ये गेली असता, आतील दरवाजाची कडी उघडण्याच्या प्रयत्नात कडीचे हॅन्डल तुटले. त्यानंतर आत अडकलेल्या महिलेने याबाबत ओरडून बाहेर उभ्या असलेल्या तिच्या पतीला सांगितले. त्यानंतर त्यांनी ईको पॉईंट येथील व्यावसायिक रेखा पाटील व भरत कांरडे यांच्या मदतीने ई-टॉयलेटच्या बाहेरच्या दरवाजाचे हॅन्डल तोडून महिलेची सुखरूप सुटका केली. आणखी थोडा वेळ झाला असता, तर मोठा अनर्थ झाला असता. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चून खरेदी केलेले निकृष्ट दर्जाचे ई-टॉयलेट पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. याबाबत पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे ई-टॉयलेट आहे की मृत्यूचा सापळा? ही बाब जर तिच्या पतीच्या लक्षात आली नसती, तर कदाचित आत अडकलेल्या महिलेचा गुदमरून मृत्यू झाला असता. वेळीच नगरपरिषदेने आपला कारभार सुधारावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
कल्पना पाटील,
माजी मुख्याध्यापिका







