कामकाजाचा बोजवारा, पत्रकार पोहोचताच आवराआवर; अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीने कार्यालयीन कारभारावर प्रश्नचिन्ह
| पेण | प्रतिनिधी |
नागरिकांची कामे रखडलेली असताना शासकीय कार्यालयात अधिकारी-कर्मचारी आपली कर्तव्ये बजावत आहेत की, वाढदिवसाच्या जल्लोषात मग्न आहेत? पेण-खाचरखिंडी येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या कार्यालयाला प्रसारमाध्यमांच्या अचानक भेटीत याच प्रश्नाचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले.
अनेक कर्मचारी आपल्या जागेवर अनुपस्थित असताना कार्यालयात उपस्थित असलेले कर्मचारी नियमित कामकाजाऐवजी वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त असल्याचे दिसून आले. पत्रकार कार्यालयात पोहोचताच मात्र या जल्लोषाला अचानक ब्रेक लागला आणि घाईघाईने आवराआवर सुरू झाली. उपअभियंता नासुंकड यांच्या कार्यालयातही केवळ कनिष्ठ अभियंता रा.पा. हंबीर उपस्थित असल्याचे आढळले. इतर अधिकारी व कर्मचारी कुठे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती देण्यास कोणीही तयार नव्हते. विशेष म्हणजे, हालचाल नोंदवही (मुव्हमेंट रजिस्टर) आणि हजेरी पुस्तकाची मागणी करूनही ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कार्यालय एकांत ठिकाणी असल्याचा फायदा घेत कर्मचारी मनमानी पद्धतीने कामकाज करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. एकीकडे नागरिकांची विविध कामे प्रलंबित असताना, दुसरीकडे कार्यालयीन वेळेत वाढदिवसाच्या तयारीला प्राधान्य दिले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे सर्वाधिक प्राधान्याने होणे अपेक्षित असताना अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, हजेरी व हालचाल नोंदवही देण्यास टाळाटाळ आणि कार्यालयीन वेळेत वाढदिवसाचा जल्लोष हा प्रकार प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कार्यकारी अभियंता ‘नॉट रिचेबल'?
या प्रकाराबाबत कार्यकारी अभियंता प्रशांत मयेकर यांच्याशी अनेकदा भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर कनिष्ठ अभियंता हंबीर यांनी मयेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर मयेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला; मात्र कार्यालयातील अनियमिततेबाबत त्यांनी दिलेली उत्तरे समाधानकारक नसल्याचे दिसून आले.







