अनधिकृत बांधकामांवर फिरवला जेसीबी
। माणगाव । प्रतिनिधी ।
दिघी-माणगाव-पुणे राज्य महामार्गाचे काम चालू असताना माणगाव शहरातील मोर्बा रोडवरील अतिक्रमणे तोडण्यात आली होती. मात्र, दीड वर्षांपूर्वी या दुकानदारांनी पुन्हा आपली दुकाने मोरबा रोड लगत फुटपाथवर लावली होती. ती दुकाने बुधवारी (दि. 5) जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आली आहेत.
माणगाव शहर हे भौगोलिकदृष्ट्या रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि, हेच शहर सध्या वाहतूककोंडीचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार यादिवशी, तर माणगाव शहरातून चालणे हे पादचारी नागरिक आणि वाहनचालकांना डोकेदुखी होऊन राहिले आहे. याविरुद्ध माणगाव मुंबई-गोवा महामार्गालगत असणारी व्यापारी लोकांनी केलेली अतिक्रमणे मूलभूत कारणीभूत असल्याचे अधोरेखित करत माणगाव नगरपंचायतीने या अतिक्रमणांना नोटिसा बजावत हातोडा कारवाईचे सत्र सुरू केले आहे. ते कायम राहणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी स्पष्ट केले आहे. माणगाव शहरात अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे करुन महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर अतिक्रमणे करण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना होत होता. यांची दखल घेऊन नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी संतोष माळी यांच्या आदेशानुसार मोरबा रोड मार्गावरील सर्व अतिक्रमणे बुधवारी जेसीबी फिरवून हटविण्यात आली.
नगरपंचायतीची तोडक कारवाई
माणगाव शहरातील मोर्बा रोडवरील अतिक्रमणे तत्कालीन गटविकास अधिकारी, माणगाव प्रांताधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत हटविण्यात आली होती. मात्र, नगरपंचायतीच्या दुसर्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर याच ठिकाणी फुटपाथवर पुन्हा बस्तान बसविण्यात आले. आणि नगरपंचायतीने त्या गाळ्यांवर गमने नोटिसा चिटकविल्या. आता मात्र नगरपंचायतीने तोडक कारवाई करत हे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे या मोरबा रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. तसेच, माणगावातील उर्वरित सर्व अतिक्रमणे टप्प्या-टप्प्याने हटविण्यात येतील, असा इशारा संतोष माळी यांनी दिला आहे.







