पाच जणांना अटक
। पुणे । प्रतिनिधी |
जुन्या वादातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश बाळू वायकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नागेश बिलनार (20), मंगेश आंबोरे (23), सचिन अवसरमल (23), अभिषेक गायकवाड (23), राजकुमार गायकवाड (18) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चिरंतन सतीश वाघमारे याने याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, वायकर आणि वाघमारे यांची आरोपींशी काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. बुधवारी (दि. 05) रात्री साडेआठच्या सुमारास वायकर आणि वाघमारे वाघोली परिसरातून निघाले होते. यावेळी आरोपींनी त्यांना अडवले आणि शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वायकर याने पाळण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी पाठलाग करुन त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पसार झालेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.






