फेअर डीलच्या माध्यमातून अवैध धंदे सुरु
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात लॉटरीच्या नावाखाली जागोजागी जुगार अड्डे सुरू आहेत. अनेक तरुणांना नादी लावून लॉटरीच्या नावाखाली जुगार अड्डे चालवणारे आरोपी त्यांची लूट करीत आहेत. अवैध धंदे करणारी मंडळी त्यांना जुगाराचे व्यसन लावून त्यांची लूट करीत आहेत. लॉटरीच्या नावाखाली अलिबाग, रेवदंडा, नागोठणे, रोहा, तळा, रसायनी, महाड, पेण, मोहोपाडा तसेच अन्य काही भागांमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आहे. त्यातून अनेकजण या जुगाराच्या नादी लागले आहेत. झटपट पैसे मिळवण्याच्या नादात अनेकजण लॉटरीवजा जुगार खेळून आर्थिक लूट करून घेत आहेत.
रायगड जिल्ह्यात लॉटरी तसेच जुगार खुलेआम सुरु असून, चक्री ऑनलाईन जुगाराच्या विळख्यात ज्येष्ठांसह युवा पिढीदेखील अडकली आहे. सरकारमान्य लॉटरीच्या नावाखाली फेअर डीलच्या नावाने खुलेआम वीसपेक्षा जास्त चक्री ऑनलाईन, मटका, ऑनलाई लॉटरी तसेच जुगार अड्डे सुरु असल्याचे पुरावे कृषीवलच्या हाती लागले आहेत. याठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होत असून, पोलिसांना चकवा देत राजरोसपणे हा धंदा सुरु आहे. मात्र, या धंद्यांना नेमके कोणाचे पाठबळ मिळत आहे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद करण्याचा कांगावा करीत असले तरी या बंदमधील चालू धंद्यांना पाठबळ कोणाचे? हे न समजणारे कोडे आहे.
रायगडकर चक्रीच्या चक्रात
चक्री जुगार हा सरकारमान्य असल्याचे भासवून हजारो लोक या जुगाराच्या चक्रात अडकले असून, ते आपली सर्व कमाई येथे लावत आहेत. हा जुगार तात्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. काही टोळीचे सदस्य ऑनलाईन चक्री जुगार चालवत आहेत. गर्दीच्या परिसरात खुलेआम हे जुगार अड्डे सुरु आहेत. या अड्ड्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत की नाही, असा सवाल जागरुक नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे हजारो नागरिक आपला संसार उद्ध्वस्त करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. छुप्या पद्धतीने पोलिसांच्या नजरेआड अनेक अवैध धंदे फोफावत आहेत.
अनेक सरकारमान्य लॉटरी बंद
भारत सरकारमान्य ऑनलाईन लॉटरी मागील अनेक वर्षांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र, जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर बक्षिसांमध्ये तफावत आणि त्याचे स्वरूप बदलल्याने सरकारमान्य ऑनलाईन लॉटरी मोठ्या प्रमाणात बंद झाली आहे. मात्र, अलिबागमध्ये चक्री जुगार ही सरकारमान्य लॉटरी असल्याचे भासवत आपले अवैध धंदे चालवत आहे.
कोण चालवतो चक्री?
पवळे तसेच फेअर डील या कंपनीच्या माध्यमातून अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. परिसरात उघडपणे सुमारे 20 पेक्षा अधिक ठिकाणी हे धंदे सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसभर काम करुन घरी येणारा कामगार आपली दिवसभराची कमाई या जुगार अड्ड्यावर हारत आहे. यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
यांच्या नावाने सुरु आहेत धंदे
लाते, अन्सारी, नागवेकर, मालपाणी, गोंधळी, चोरडेकर, वाडकर, मोरे, सानप, वाघमारे, म्हात्रे, दिवेकर, वाजिद, कविस्कर, गुरव, पाटील, किरकिरे, पंगत, डुकरे, खराटे.
याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नाही. तुम्ही कंपनी मालकांना विचारा.
मॅनेजर,
फेअर डील कंपनी
सिद्धूकडून होतेय वसुली?
जिल्ह्यात ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली चालू असलेला जुगार कोणाच्या ना कोणाच्या आशीर्वादानेच चालत असणार, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यामध्ये राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादापोटी हा धंदा चालवणारे लोक महिन्याला खालपासून वरपर्यंत जवळपास 17 लाखांचा मलिदा वाटप करत असल्याचीही चर्चा आहे. तसेच याची वसुली सिद्धू नामक व्यक्ती करीत असून, आता हा मलिदा नक्की कोणा-कोणाच्या घशात जातोय? याबद्दलही सामान्यांना उत्सुकता आहे.







