। जालना । प्रतिनिधी ।
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे मजुराच्या पत्र्याच्याशेड जवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने पाच मजुरांचा वाळूखाली दाबून मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम करणारे हे मजूर होते. वाळूचा ट्रक पत्र्याच्या निवाऱ्यावर रिकामा केल्यामुळे पत्रे दबले. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून एक 13 वर्षीय मुलगी आणि एका महिलेला वाचवण्यात यश मिळाले आहे. ही घटना पहाटे साडेचार वाचण्याच्या सुमारास घडली.
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचे काम करणारे मजूर पुलाशेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते. सात जण या पत्र्याच्या निवाऱ्यामध्ये झोपले होते. दरम्यान, पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास वाळूचा ट्रक पत्र्याच्या निवाऱ्यावर रिकामा केल्यामुळे पत्रे दबले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून यातील दोघांना वाचविण्यात यश आले. यामध्ये 13 वर्षाच्या मुलीचा व महिलेचा समावेश आहे.
पासोडी शिवारामध्ये पुलाचे काम सुरू असून कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून ठेकेदार रात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकत होता. ठेकेदार आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.
गणेश काशिनाथ धनवई (वय 50, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), भूषण गणेश धनवई (वय 17, रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), राजेंद्र दगडूबा वाघ (वय 40, रा. दहिद, ता. बुलढाणा), सुनील समाधान सपकाळ (वय 20, रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना), सुपडू आहेर, (वय 38, रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव) अशी मृतकांची नावे आहेत.