। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील मोर्बा येथील एका 68 वर्षीय वृद्धाने अज्ञात कारणास्तव येथील काळनदी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.21) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
माणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मयत लियाकत अलीअब्दुल करीम गंगरेकर (68) रा.मोर्बा ता.माणगाव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव माणगाव काळनदी पुलावरून उडी मारली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वृद्धाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निमकर हे करीत आहेत.