एक लाख पाच हजार 868 जणांना टँकर्सची प्रतिक्षा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अनेक धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जनतेवर पाणी कपातीचे संकट वाढू लागले आहे. ऐन लग्न सराईत पाण्याचा दुष्काळ गावागावात जाणवू लागला आहे. आमदार व मंत्र्यांच्या मतदार संघातच घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अलिबागसह तेरा तालुक्यातील 1 लाख 5 हजार 868 नागरिकांना टँकर्सच्या प्रतिक्षेत रहावे लागत आहे.
रायगड जिल्ह्यात लघु पाटबंधारे विभागाची 28 धरणे असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची 9 पाझर तलावं आहेत. तसेच उमटेसह, तिनविरा अशी अनेक धरणे आहेत. या धरणासंह तलावांमधून जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र, मे महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे. काही धरणांमधील जलसाठा अत्यल्प असून, काही धरणामधील जलसाठाच संपला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई समोर आली आहे. जिल्ह्यातील मूरूड व तळा वगळता अन्य 13 तालुक्यांतील 1 लाख 5 हजार 686 नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 46 गावे आणि 186 वाड्या अशा एकूण 232 ठिकाणी पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, म्हणून जिल्हा परिषदेमार्फत केंद्र पुरस्कृत जलजीवन योजना राबविण्यात आली. ही योजनाही फेल ठरल्याचे चित्र समोर येत आहे. करोडो रुपयांचे खर्च करूनही या योजनेचा जनतेला काहीच फायदा झाला नसल्याची संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदार संघातील 8 हजार 782, महाड विधानसभा मतदारसंघातील 29 हजार, पनवेलमधील 14 हजार 248, उरणमधील 1 हजार 351, कर्जतमधील 12 हजार, तर श्रीवर्धनमधील 11 हजार नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आमदार व मंत्र्याच्या मतदार संघातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या मतदारसंघातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यास मंत्री व आमदार उदासीन ठरले असल्याचे दिसून येत आहे.
टँकरमुक्तीची घोषणा फक्त कागदावर
रायगड जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत जलजीवन योजनेसह राज्याच्या अनेक पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या. घरोघरी नळ देण्याच्या जाहीरातबाजीदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. मात्र, प्रशासनासह शासन मुबलक पाणी देण्यास पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनची टँकरमुक्तीची घोषणा फक्त कागदावर असल्याचे टँकरच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे. मागील आठवड्यात 87 हजार नागरिकांसाठी 50 टँकर होते. आता या टँकरमध्ये दहाने वाढ होऊन तो आकडा साठवर पोहचला आहे.






