जेजुरीला देवदर्शनासाठी जाताना अपघात, आठ जण जखमी
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातील मॅजिक पॉईंडजवळील वळणावर खासगी मिनीबस पलटी होऊन भीषण अपघात झाला. मुरबाडवरून जेजुरीकडे देवदर्शनासाठी जाणाऱ्या नवविवाहित कुटूंबियांच्या बसचा बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून खासगी बसचालक भरत रमेश शेळके (रा. शेळके पाडा, मुरबाड, ठाणे) हा मुरबाडमधील शेळकेपाडा गावातील नवविवाहितांच्या कुटूंबियांना जेजुरीला देवदर्शनासाठी घेऊन जात होता. बोरघाटातील मॅजिक पॉईंडजवळील वळणावरील तीव्र उतरावर आले असता बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट महामार्ग पोलीस, हेल्प फाउंडेशनची टीम, आयआरबी टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.






