| मुंबई | प्रतिनिधी |
दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरात गोल मशीदजवळील मरीन चेंबर या निवासी इमारतीत शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास भीषण आग लागली. मुंबई हॉस्पिटलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मरीन चेंबर इमारतीत ही आग लागली असून, अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मरीन लाईन्स गोल मशिदीजवळील प्रसिद्ध जाफर हॉटेलच्या जवळ ही इमारत आहे.
पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली आहे. आगीची तिव्रता वाढली असून, आगीच्या ज्वाला सदनिकेच्या खिडकीतून बाहेर येत आहेत. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, पाण्याचे पाच मोठे टँकर घटनास्थळी रवाना झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून, या परिसरातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.