चरई येथील भव्य पटांगणार आयोजन; पुरूष गटातील तीनही सामने अतिटतिचे
| ठाणे | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने ठाण्यातील 101 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री मावळी मंडळातर्फे 73व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या चरई येथील भव्य पटांगणार करण्यात आले आहे. या स्पर्धेत रा.फ. नाईक, टागोर नगर मित्र, ज्ञानशक्ती युवा यांची महिला गटात, तर उत्कर्ष् मंडळ, जय बजरंग व वाशिंद यांनी पुरुष गटात 5-5 चढाईच्या डावात विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या सामन्यात रा.फ. नाईक संघाने शताब्दी स्पोर्टस्चा प्रतिकार 34-30 असा मोडून काढला. रेखा चिकणे, भारती शेळके यांच्या चढाई पकडीच्या खेळमुळे रा. फ. नाईकने पूर्वार्धात लोण देत 21-14 अशी आघाडी घेतली. परंतु, उत्तरार्धात शताब्दीच्या नंदिनी मौर्या, अनघा गायकवाड यांनी आपला खेळ गतिमान करीत लोणची परतफेड करीत सामन्यात चूरस निर्माण केली. परंतु, संघाला विजयी करण्यात त्या अपयशी ठरल्या. उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाने ठाण्याच्या प्रेरणा कलाला 27-23 असे नमवीत आगेकूच केली. प्रतिक्षा भागवत, सायली फाटक यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रेरणाच्या साधना जाधवने एकाकी लढत दिली. ठाण्याच्या ज्ञानशक्ती युवाने उपनगरच्या स्वस्तिक मंडळावर 47-28 अशी मात केली. विश्रांतीला 2 लोण देत 29-14 अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानशक्तीने विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत आपला विजय सोपा केला. हिमानी गायकवाड, यतिक्षा बागडे, पौर्णिमा देवरे यांच्या झंझावाती खेळाने ज्ञानशक्तीला 19 गुणांच्या फरकाने विजय मिळविता आला. स्वस्तिकच्या दिव्या तिरवडकर, वनिता यादव चमकल्या.
पुरुषांच्या लढती मात्र पहिल्या फेरीपासुन चुरशीच्या झाल्या. उपनगरच्या उत्कर्ष मंडळाने 5-5चढायांच्या डावात ठाण्याच्या विजय मंडळाला 44-43 (6-5) असे चकवीत आगेकूच केली. सुरुवातीपासुन चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पहिल्या डावात 20-18 अशी उत्कर्ष कडे आघाडी होती. परंतु, पूर्ण डावात विजयने 38-38 अशा बरोबरीत सामना आणला. 5-5 चढायात मात्र उत्कर्षने बाजी मारली. दुसऱ्या सामन्यात जय बजरंग, वाशिंदने 5-5 चढायांत उपनगरच्या मुलुंड स्पोर्टस्चा 35-32 (8-5) असा पाडाव केला. मध्यंतराला 14-11 अशी जय बजरंगकडे आघाडी होती. पूर्ण डावात मुलुंड स्पोर्टस्ने 27-27 अशा बरोबरीत सामना आणला. परंतु, 5-5 चढायांत त्यांना विजयाची किमया साधता आली नाही. श्री विठ्ठल मंडळाने श्रीराम कबड्डी संघाला 43-27 असे नमविले. उपनगरच्या शूर जवानने चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या नवरत्न मंडळावर 45-43 असा विजय मिळविला. आक्रमक सुरुवात करीत 2 लोण देत 25-10 अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या शूर जवानला नंतर मात्र नवरत्नने चांगलेच जेरीस आणले. मध्यंतरा नंतर त्या 2 लोणची परतफेड करीत सामना रंगतदार केला. परंतु संघाला विजयी करण्याय ते कमी पडले.







