नागेश पाटील आष्टीकर यांची हकालपपट्टी
| मुंबई | प्रतिनिधी |
ठाकरेसेनेच्या 6 फुटीर खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 6 खासदारांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिंदेसेनेचे अन्य आमदार, मंत्री आणि खासदार उपस्थित होते.खासदार ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख या सहा खासदारांनी सोमवारी (दि.22) शिंदेसेनेत प्रवेश केला. दरम्यान, फुटीर खासदार आष्टीकरांच्या मुलाची ठाकरेसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्याचे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी फुटीर भूमिका घेतल्यानंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. त्यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाकडून रिंगणात उतरले होते. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियातून यासंबंधी घोषणा केली आहे. यावेळी नांदेड विधान परिषद निवडणुकीत कृष्णा पाटील यांना केवळ 84 मते मिळाली, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू असलेले भाजप उमेदवार अमर राजुरकर यांनी 339 मते मिळवत विजयाची हॅट्रिक साधली.
ऑपरेशन टायगरमुळे संभ्रमः
नागेश पाटील आष्टीकर यांना मुलाचा पराभव हा मोठा धक्का मानला जात असला, तरीही कृष्णा पाटील पित्याप्रमाणे गेम करुन दगाबाजी करणार, अशी अटकळ ठाकरे गटातून आधीच बांधली जात होती. काँग्रेसकडे 92 संख्याबळ असताना 19 संख्याबळ असलेल्या ठाकरे गटाला नांदेडची जागा सुटली होती. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस निर्माण झाली असताना मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली. खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या धडकल्या, त्यामुळे काँग्रेससह ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नगरसेवकही संभ्रमात पडले होते.
महायुतीची 100 मते फुटली
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी 301 मतांनी विजय मिळवला असून, त्यांना 593 मते मिळाली. महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी देखील 292 मते मिळवत चुरशीची लढत दिली. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजप 325, राष्ट्रवादी (अजित पवार) 205, शिवसेना (शिंदे गट) 116, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) 120, काँग्रेस 74, शिवसेना (ठाकरे गट) 1, स्थानिक आघाड्या आणि अपक्ष 54 असे पक्ष निहाय संख्याबळ होते. त्यामुळे महायुतीच्या मतांचा आकडा 646 होता, तर महाविकास आघाडीकडे 195 मते होती. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांपैकी बहुतांश मते ही महायुतीच्या गोटातील होती. तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल 100 मते फोडल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे.







