विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, दि. 22 जूनपासून सुरू होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद रविवार, दि. 21 जून रोजी पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना (ठाकरे गट) नेते भास्कर जाधव, अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी विरोधकांनी एल-निनोमुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, हमीभाव, कर्जमाफी, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी कपात तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवरून सरकारला घेरण्याचा इशारा दिला. लाडकी बहीण योजनेत केवायसी सक्तीमुळे सुमारे 81 लाख महिला वगळल्या गेल्याचा मुद्दाही विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.







