। पुणे । प्रतिनिधी ।
पिंपरी- चिंचवडमध्ये संतापजनक घटना घडली आहे. येथील काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात ही घटना उघडकीस आली. अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. या घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने तक्रार दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.







