105 खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित; सात आस्थापने बंद करण्याचे आदेश
| मुंबई | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सणात खाद्यपदार्थांच्या विक्रीत वाढ होत असतानाच अन्नसुरक्षेच्या नियमांना हरताळ फासणाऱ्या खाद्य व्यवसायांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जोरदार कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल 105 खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर सात आस्थापने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. झेप्टो, ब्लिंकिट, बिर्याणी बाय किलो यांसारख्या नामांकित ब्रॅण्ड्सचाही कारवाईत समावेश असल्याने खाद्य व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एफडीएने 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी राज्यभरात ही धडक मोहीम राबवली. मुंबईतील 28 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये झेप्टोचे वरळीतील आऊटलेट, ब्लिंकिट, बिर्याणी बाय किलो, टॉसिन पिझ्झाचे वरळीतील आऊटलेट आणि जम्बो बर्गर यांचा समावेश आहे. अन्नसुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
गंभीर स्वरूपाचे नियमभंग आढळल्याने राज्यातील सात आस्थापने पूर्णपण्ो बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पुण्यातील तीन, अमरावतीतील दोन, तर मुंबई आणि कोकण विभागातील प्रत्येकी एका आस्थापनेवर ही कारवाई करण्यात आली. बोरीवलीतील एका बिर्याणी सेंटरने अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्याने ते बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.
नागपूरमधील कामठी रोडवरील डी-मार्ट आऊटलेटमध्येही परवान्यातील अटींचा भंग झाल्याचे आढळले. त्यामुळे तेथील रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान 69 हून अधिक आस्थापनांमधून एक कोटी 35 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. हा साठा आरोग्यास अपायकारक किंवा भेसळयुक्त असण्याचा संशय आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधातील कारवाईत तीन एफआयआर दाखल करण्यात आले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. तसेच दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना एफडीएने या कारवाईतून स्पष्ट इशारा दिला आहे.
कारवाईचा राज्यव्यापी दणका
* 105 खाद्य व्यवसायांचे परवाने निलंबित
* 7 आस्थापने बंद करण्याचे आदेश
* 1.35 कोटींहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त
* 69 हून अधिक आस्थापनांची तपासणी
* 3 एफआयआर दाखल
* 2 जणांना अटक
* 2 वाहने जप्त
अन्नसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
एफडीएच्या कारवाईत झेप्टो, ब्लिंकिट, बिर्याणी बाय किलो, टॉसिन पिझ्झा आणि जम्बो बर्गर यांसारख्या खाद्य व्यवसायांचा समावेश आहे. मुंबईतील 28 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. नामांकित ब्रॅण्ड्सवर झालेल्या या कारवाईमुळे ऑनलाइन खाद्यपदार्थ आणि झटपट वितरण सेवांच्या अन्नसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






