| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पार्किंगची जागा आणि पाळीव कुत्र्याच्या विष्ठेवरून सुरू झालेला किरकोळ वाद अखेर हत्येपर्यंत पोहोचला. शेजाऱ्याने परवानाधारक पिस्तुलातून तब्बल 15 गोळ्या झाडून टेक महिंद्राचे आशिया विभागप्रमुख परमजीत धनखड यांची हत्या केली. हरियाणातील फरिदाबाद येथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली.
धनखड आणि आरोपी मोनू शर्मा एकाच इमारतीत राहत होते. पार्किंगच्या जागेवरून दोघांच्या कुटुंबांत वारंवार वाद होत होते. शुक्रवारी रात्री धनखड जिममधून घरी परतले असता त्यांच्या पार्किंगमध्ये शेजाऱ्याची गाडी उभी असल्याचे दिसले. गाडी हटवण्यावरून झालेल्या वादातून आरोपीने गोळीबार केला. यात नऊ गोळ्या लागल्याने धनखड यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी संपूर्ण कुटुंबासह फरार झाला असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.







