। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे ज्येष्ठे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना शनिवारी (दि.7) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. शरद पवार यांना छातीत दुखणे आणि कफाचा त्रास जाणवल्यामुळे सोमवारी (दि.2) पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना बुधवारी (दि.4) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार घरीच सुरु राहतील, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.






