। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील सखी ग्रुप आयोजित गृहोपयोगी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आज दि.23 ऑक्टोबर रोजी शनि मंदिराच्या रवि किरण सभागृहात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, नगरसेविका संचिता पाटील, सखी ग्रुपच्या मिना प्रभाळकर, वनिता सोनी, तन्वी जोशी, कविता राठी, प्रज्ञा परांजपे, सपना शहा उपस्थित होत्या.
प्रदर्शनात एकूण 42 महिलांनी आपापले स्टॉल मांडले होते. फॅन्सी ज्वेलरी, साड्या, लहान बाळांचे कपडे, बेडशीट, ड्रेस मटेरिअल, पूजेच्या वस्तू, विविध पर्सेस, घर सजावटीच्या वस्तू, घाणीचे खाद्य तेल, क्रोशाच्या वस्तू आणि विविध खाद्यपदार्थ असे गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळाले. कोविड 19 चे सर्व नियम पाळून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर भरवल्या गेलेल्या या प्रदर्शनाच्या निमित्ताने ग्राहकांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये खूप उत्साह दिसून आला.