मुख्यमंत्री कार्यालयाला मेल
| जळगाव । प्रतिनिधी |
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात दंगली घडविण्यात येतील. जळगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भ्रष्ट असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे, अशा स्वरूपाचा धमकीचा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झालेला हा ई-मेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलिसांना पाठविण्यात आला असून पोलीस या ई-मेलच्या संदर्भात सखोल तपास करत आहेत. तर या घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांना तपास करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तर जिल्हाधिकारी यांच्यासह विविध पोलीस अधिकार्यांना जीवे मारण्याबाबत अगोदर ही तीन ते चार वेळेस धमकीचे मेल हे पोलिसांना मिळाले आहेत. या मेलमधील भाषा पाहता अशा ई-मेलकडे फारसे गांभीर्याने घ्यावे, असे दिसत नाही. मात्र, तरीही या सगळ्या घटनेबाबत सायबर सेलच्या माध्यमातून गुन्हा दाखल करत मेल करण्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.