| पुणे | प्रतिनिधी ।
ढोकळवाडी वारक गावात जमिनीच्या वादातून नात्याची मर्यादा ओलांडणारी थरारक घटना घडली आहे. पुतण्याने आपल्या काकावर छर्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे ढोकळवाडी परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान चिंधू ढोकळे (42) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. तर नवनाथ नामदेव ढोकळे असे आरोपीचे नाव आहे. सोपान ढोकळे यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर त्यांनी शेड बांधण्यासाठी फाउंडेशन तयार केले होते. मात्र, यावरून पुतण्या नवनाथ याच्या मनात द्वेष आणि असंतोष निर्माण झाला होता. वाद वाढल्यावर नवनाथने आपल्याकडील छर्याची बंदूक काढून काकावर गोळीबार केला. या घटनेत गोळी काकाच्या कानामागून चाटून गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि सोपान ढोकळे गंभीर जखमी झाले. जखमी ढोकळे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी नवनाथ ढोकळे याला अटक केली आहे. त्याच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून गोळीबारासाठी वापरलेली बंदूक जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. नात्यातून असा हिंसक प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.