। महाड । विशेष प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी (दि.12) छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त रायगड किल्ल्यावर हजेरी लावली. यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी देखील गेले. तटकरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनादेखील निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे भरत गोगावले नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
माझे कर्तव्य होते, मी भरतशेट गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केले होते. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहीत नाही. पण मी माझे कर्तव्य केले. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडेसुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजेत. स्वर्गिय चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती रूजवली आहे, ते संस्कार आमच्या सर्वांवर झाले आहेत. बाकी त्याबद्दल मी आणखी काही बोलणार नाही.
– खा. सुनिल तटकरे