तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये
| मुंबई | प्रतिनिधी |
अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे यांनी गुटख्याविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. गुटखा, निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तंबाखूमिश्रित प्रतिबंधित पदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध मकोका लावण्याचे आदेश मुंढे यांनी दिले आहेत.
अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी गुटखा विक्रेत्यांना संरक्षण देत असल्याचे आरोप होत आहेत. त्याचीही चौकशी केली जात असून कुणीही अधिकारी यात आढळला तर त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावरही कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही मुंढे यांनी यावेळी दिला.
तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (दि.13) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. मुंढे यांनी गेल्या महिनाभरात राज्यभरात धाडी घालून 3 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच 35 पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले. त्यानंतरही गुटखा विक्री सुरूच असल्याची माहिती हाती आल्याने त्यांनी अधिक कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. गुटखा विक्री ही संघटित गुन्हेगारी असल्याने उत्पादकापासून विक्रेत्यापर्यंत सर्वांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत मकोका कारवाई करण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले. मकोका लावण्यापूर्वी आरोपीचा इतिहास पडताळला जाईल, असेही त्यांनी सांगितले.







