| मुरुड जंजिरा | प्रतिनिधी |
लडाखसारख्या रणभूमीवर जीवाची बाजी लावून देशवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांशी संवाद साधण्याबरोबरच तेथे शहीद झालेल्य जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्याची संधी महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांना नुकतीच लाभली. तेथे बंदोबस्तासाठी असणाऱ्या जवानांच्या शौर्यगाथा ऐकून या छायाचित्रकारांच्या अंगावर रोमांचे उभे राहिले.
महाराष्ट्रातूल नावाजलेले छायाचित्रकार यांची सहल नुकतीच लेह लडाख येथे नामवंत छायाचित्रकार वैभव जागुष्टे यांनी आयोजित केली. जगातील विविध निसर्ग टिपणे व सुंदर छायचित्रे जगासमोर आणणे हा उद्देश या सहलीची आहे. परंतु लडाखच्या बर्फाच्छादित सियाचीनमध्ये जेव्हा हे छायाचित्रकार पोहोचले त्यावेळी तेथील हवामान आणि जवानांचे तेथील वास्तव पाहून सारेच थक्क झाले. शिवाय त्यांच्या पराक्रमांच्या गाथांनी मनही प्रसन्न झाले.
सियाचीन ग्लेशिअर ट्रेकिंग या मोहिमेची सर्वात पहिली बॅच 2007 मध्ये गेली होती. त्याचवर्षी आर्मी माऊंटेनिअरिंग इन्स्टिट़यूटची स्थापना जे. जे. सिंग मार्गदर्शनाखाली झाली. तेव्हापासून मोहिमेची प्रत्येक वर्षी एक बॅच जात असे. या ट्रेक दरम्यान लडाख, सियाचीनपर्यंतचा प्रवास डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतो. लडाख म्हणजे हिमा लय आणि काराकोरममधले घरटेच आहे. समुद्रसपाटीपासून 3500 मीटर उंचीवर असलेले, पृथ्वीवरील एक अवर्णनीयअशी ही जागा छायाचित्रकारांसाठी तर हा प्रदेश एक नजाराच आहे. यावेळी वैभव जागुष्टे ,संजय जागुष्टे, संजय सकपाळ, प्राची मोरे, डॉ मोरे, राजेंद्र वाघमारे, तावनीत कौर, आयेशा कौर, यांनीही शहीद जवानांना आदरांजली वाहिली.







