। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर शहरातील गोल्ड सिनेमा परिसरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल सावंत (27) ही तरुणी गोल्ड सिनेमा परिसरातील एका इमारतीत भाड्याने राहत असून ती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोराने तिच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तिच्या मानेवर व कमरेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमी स्नेहल सावंत हिला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणात स्नेहल सावंत हिचा प्रियकर अमोल मुळे याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.






