| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसाळी हंगाम सुरु होण्याच्या वाटेवर आहे. जिल्ह्यात पाऊस कधीही कोसळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील 392 गावांना दरडीचा धोका निर्माण झाला आहे. अडीच लाख नागरिकांवर दरडीचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.दरडीपासून बचाव करण्यासाठी आपत्कालीन विभागाने कंबर कसली आहे. अपदा मित्रांसह रेस्क्यू टीम आदी यंत्रणाशी संवाद साधण्याचे काम करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये यापुर्वी महाड व पोलादपूर तालुक्यात दरड कोसळून तीनशेहून अधिक जणांचा बळी गेला. काहीजण त्या दरडीखालीच दबले गेले. 2021 मध्ये महाड येथील तळीये येथे झालेल्या दरडीत 84 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये 19 ते 20 जूलै मध्यरात्रीच्या सुमारास इरसालवाडीत दरड कोसळली. या दरडीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. तर काही जण दरडीखाली दबून गेले. रायगड जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. डोंगर भागाजवळील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूरपासून पनवेलपर्यंत, कर्जत, रोहा, अलिबाग अशा अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली डोंगरांचे खोदकाम करण्यात आले आहेत. स्थानिकांसह पर्यटकांचा डोंगर भागात फिरण्याचा आनंद नष्ट झाला आहे. डोंगराचे भाग ढिसूळ झाले आहेत. आहे. त्याचा परिणाम पावसाळ्यात अतिवृष्टीमध्ये होण्याची भिती निर्माण झाली आहे.
जमीनीची धुप होऊन दगड, माती व झाडे उन्मळून कोसळण्याच्या घटना घडण्याची भिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाऊस कधीही कोसळणार आहे. पावसाचा हंगाम सुरु होण्याच्या वाटेवर आहे. वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीमुळे होणारी आपत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. दरडग्रस्त भागांचे सर्वेक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नागरिकांची सुरक्षितता यावर भर देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. रायगड जिल्ह्यातील 13 तालुक्यांत 392 दरडग्रस्त गावे आहेत. या गावांमधील सुमारे अडीच लाख नागरिकांना दरडीचा धोका असण्याची शक्यता आहे. त्यात पोलादपूरमधील 139, महाडमधील 122, अलिबागमधील 9, कर्जतमधील 5, खालापूरमधील 12, तळामधील 3, पनवेलमधील 3, पेणमधील 13, रोहामधील 20, सुधागडमधील 9, म्हसळामधील 14, श्रीवर्धनमधील 12, मुरूडमधील 9 ,माणगांवमधील 22 गावांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील चिंचोटीसह, सोगाव आदीवासीवाडी, सागाव आदिवासीवाडी, वाडगाव, ताजपूर, जांभूळपाडा, वेलेटवाडी. रोहामधील किल्ले, खारगाव, तिसे, वाळुंजवाडी, कवळठे आदिवासीवाडी, वरसगाव मधली आळी, मेढा, घोसाळे, आरे बुद्रुक, संभे, नादवली, वावेखार, पाले खुर्दे, महादेववाडी, शेणवई आदीवासीवाडी, भागीरथी खार, कुंभोशी. मूरूडमधील सर्वे वावे, सावली, हिलसरडा सोसायटी, चेहेर, फोफळी, मिठेखार, राजपुरी, एकदरा या गावांसह वाड्यांचा समावेश आहे.
दरडप्रवण गावांमध्ये उद्घोषणा प्रणाली
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात 392 दडरडग्रस्त गावे आहेत. दरडग्रस्त गावांची एकपासून पाचपर्यंत वर्गवारी करण्यात आली आहे. 240 गावांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाचवेळी हवामानाची पुर्व सुचना प्रसारित केली जाणार आहे. धोक्याच्या सुचनेसाठी सायरन वाजविले जाणार असल्याचे सांगण्यात आल आहे.
600 अपदा मित्रांची घेणार मदत
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांची मदत मिळावी म्हणून जिल्ह्यातील 600 अपदा मित्र आणि सखींची मदत घेतली जाणार आहे. यांना प्रशिक्षण देण्यात आले असून शोध, बचावाचे कीट, ओळखपत्र आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.






