| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-मुरबाड मार्गावरील पिंगळेवाडी गावासमोरील वळणावर मालवाहू कंटेनर पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.11) मध्यरात्री घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणा राज्यातील मेवात जिल्ह्यातील रहिवासी तौफिक सिकंदर हे पुष्पक फ्रेट कॅरिअर ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून कार्यरत होते. ते आयसर प्रो 5019 कंपनीचा कंटेनर घेऊन खालापूर येथील स्काय बॉल वेअरहाऊसमधून कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या बाटल्या इंदोरकडे घेऊन जात होते. गुरुवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंगळेवाडी गावासमोरील तीव्र वळणावर कंटेनरवरील नियंत्रण सुटले. वाहनाने रस्त्यालगतच्या संरक्षक कट्ट्याला जोरदार धडक दिल्यानंतर कट्टा तोडून खोल खड्यात पलटी घेतली. या भीषण अपघातात चालक तौफिक सिकंदर यांच्या डोक्याला, छातीला व तोंडाला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने कर्जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक अख्तर महेबुब शेख यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अपघाताच्या कारणांचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.






