बा रायगड परिवार तसेच शिवशंभू प्रतिष्ठानची शोध मोहीम
| कोलाड | विश्वास निकम |
बा रायगड परिवार तसेच शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे गेली दोन दिवस अवचितगड रहाल परिसरात भटकंती आणि शोधमोहीम करत असताना एक तोफ निदर्शनास आली. या शोध मोहिमेत उपस्थित मावळे सौरभ घरट (रेवोली), मनोज थिटे (पोलीस पाटील-बाहे), संस्कार घरट (रेवोली), आर्यन काशीद(रेवोली), रोहन शेलार (रेवोली) उपस्थित होते. शोधमोहिमेत सापडलेली तोफ पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती. जी दगड मातीच्या ढिगाऱ्या खाली गाडली गेली होती. प्रथमतः तोफेच्या बाजूचा एक कान निदर्शनास आला. सर्वांनी हर हर महादेव अस जयघोष केला. शोधमोहीम यशस्वी झाल्याचा आनंद साजरा केला.
प्रथम तेथील झाडे, माती, पालापाचोळा, दगड बाजूला करून तोफ साफ करून वर काढली तर ही तोफ 4.5 ते 5 फूट लांबीची असून तोफेवर टि.डी अशी अक्षरे व त्याखाली तारीख किंवा तोफेचे वजन कोरलेले पहायला मिळाले. ही तोफ ब्रिटिश बनावटीमधील असून ती अवचितगडावरील दक्षिणेकडील बुरुजावरून खाली पडलेली असावी जी पिंगळसईकडील दक्षिण बुरुजाच्या खाली जी नाळ आहे, त्या नाळेत शोधमोहीम करीत असतांना आढळून आली. ही बाब बा रायगड परिवार तसेच शिवसंभू प्रतिष्ठान यांनी पुरातत्व खाते, वनविभाग रोहा, रोहा पोलीस प्रशासन व तहसीलदार यांना पंचनामा करण्यासाठी कळवले आहे. लवकरच या तोफेला नवं संजीवन देऊन ती तोफ पुन्हा गडावर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. या अगोदर बा रायगड परिवार तसेच शिवशंभू प्रतिष्ठान तर्फे 15 डिसेंबर 2016 रोजी व 6 जुन 2022 रोजी तोफांचा शोध लावण्यात आला आहे.






