रात्रीचा दिवस करून काम; ग्राहकांपर्यंत मुर्ती पोहचण्यास विलंब
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गणेश मुर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून अधिक जोमाने गणेशमुर्ती तयार करण्याची लगबग सूरू झाली आहे. गणरायाचे आगमन अवघ्या 73 दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्राहकांना मूर्ती वेळेवर देण्यासाठी मुर्तिकार तसेच कारागिर रात्रीचा दिवस करून काम करीत आहेत. मात्र, पावसामुळे मूर्ती सुकविण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे मुर्ती 25 दिवस उशीरा ग्राहकांपर्यंत पोहचत असल्याचे मुर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.
यंदा गणरायाचे आगमन येत्या 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. मूर्ती तयार करण्यासाठी मुर्तीकारांना अगदी कमी कालावधी मिळाला आहे. पेणमधील गणेशमुर्ती या आकर्षक, रेखीव व सुंदर म्हणून परिचित आहेत. त्यामुळे गणेशमुर्ती तयार करण्याचे माहेर घर म्हणून पेणची एक वेगळी ओळख आहे. पेणमध्ये 2 हजारहून अधिक मूर्तींचे कारखाने आहेत. परंतु, यावर्षी पीओपीच्या मूर्ती तयार करण्याबाबत मुर्तीकारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ग्राहकांकडूनही पाहिजे तशी मागणी नव्हती. पीओपी बंदीवरील निर्णयावर गणेश मुर्तिकरांचे भवितव्य अवलंबून होते. जर पीओपीवर बंदी आली तर आगाऊ बनवून ठेवलेल्या मुर्त्यांचा खर्च वाया जाणार आणि उपासमारीची वेळ येणार, अशी चिंता त्यांना सतावत होती. मात्र, 9 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्ती तयार करण्यावरील बंदी उठवून गणेशमुर्तीकारांन दिलासा दिला.
उच्च न्यायालयाचा निकाल ऐकताच पीओपीसह शाडूच्या मूर्ती बुकींगसाठी ग्राहकांची लगबग सूरू झाली आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. ग्राहकांपर्यंत वेळेवर मुर्ती देण्यासाठी मुर्तिकारांसह कारागिर कंबर कसून काम करीत आहेत. तसेच, ज्यादा मोबदला देऊन कारागिरांकडून मूर्ती तयार करण्याचे काम करून घेतले जात आहे. 10 हजारहून अधिक कामगार कामाला लागले आहेत. त्यामुळे हजारो हातांना काम मिळाले आहे. एकंदरीत मूर्ती ग्राहकांना वेळेवर देण्यासाठी मुर्तिकार आणि कारागिर शर्तीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
छावा चित्रपटातील मूर्तीला मागणी
छावा चित्रपट घराघरात पोहचला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची भुमिका अनेकांच्या हृदयात बसली आहे. त्यामध्ये संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडतानाचे दृष्य दाखविण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी सिंहाचा जबडा फाडताना छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मूर्तीला मोठी मागणी आहे. 10 टक्के ग्राहकांनी या मूर्तीला पसंती दर्शविली असून त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, दीड फुटापासून तीन फुटापर्यंतच्या मुर्तींना मागणी असल्याचे मुर्तिकार सचिन समेळ यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून गणेशमुर्ती तयार करण्याचे काम सुरु आहे. मागणी प्रचंड वाढली आहे. यावर्षी मुर्तींच्या किंमतीमध्येदेखील 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे मूर्ती सुकत नसल्याने ग्राहकांपर्यंत या मूर्ती वेळेवर पोहचण्यास अडचणी येत आहेत.
– सचिन समेळ, मूर्तिकार







