योग्य दिशा निवडूनच करिअर करा: अजित पवार
| अलिबाग | प्रतिनिधी |
मुलांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांना करिअर करण्याची संधी पालकांनी देणे गरजेचे आहे. त्यांच्याशी मैत्रीचे नाते ठेवून मुलांना उभारी देणे आवश्यक आहे. आताची पिढी ही हुशार असून तंत्रज्ञानाचे ज्ञानही चांगले आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थी महत्वाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे दिशा चुकली तर, जीवन भरकटू शकते. विद्यार्थ्यांनी योग्य दिशा निवडून करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी केले.
रायगड जिल्हा फोटोग्राफर्स ॲन्ड व्हिडोओग्राफर्स असो. संलग्न अलिबाग फोटोग्राफर्स असो. व अश्वीनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी (दि.14) संपन्न झाला. हा सोहळा अलिबागमधील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन राऊळ, अश्वीनी टीचर्स क्लासेसच्या संचालिका अश्वीनी मेहता, रायगड जिल्हा फोटोग्राफर्स ॲन्ड व्हीडीओग्राफर्सचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, उपाध्यक्ष समीर मालोदे, खजीनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर्स असो.चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील, उपाध्यक्ष राकेश दर्पे, खजिनदार विवेक पाटील, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सल्लागार सचिन म्हात्रे, सह खजिनदार प्रणेश म्हात्रे, अमर मढवी, विराज घरत, विजय पाटील, संदेश कवळे, वैभव शिंदे, जयराज वाघमारे, गणेश जाधव, मनोज पाटील, रवी गुंड, सुमित मालोदे, अभिजित काटकर, हरी देशमुख सर सर्व पदाधिकारी, सभासद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी अजित पवार म्हणाले की, भारत देशामध्ये 42 टक्के तरुण आहेत. त्यामुळे तरुणांचा देश म्हणून आपल्या देशाला ओळखले जाते. आजची पिढीही हुशार आहे, असे कौतूक करीत पवार पुढे म्हणाले, सातत्य राखून 15 वर्ष सामाजिक उपक्रम राबविणे सोपी गोष्ट नाही. विद्यार्थ्यांना उभारी देण्याबरोबरच आनंद देणे आणि कौतुकाची थाप म्हणून फोटोग्राफर्स असो.च्या माध्यमातून चांगला उपक्रम हाती घेतला आहे. फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळत असताना सामाजिक भान ठेवून फोटोग्राफर काम करतात. फोटोग्राफर हा समाजातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी टायपिंग, संगणकीय प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबरच वाचनाबरोबरच खेळणे व्यायाम करण्याची देखील आवड असणे आवश्यक आहे, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांसह पालकांचा सन्मान
दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेले आणि बारावी उतीर्ण झालेले अश्वीनी टीचर्स क्लासेसमधील गुणवंत विद्यार्थ्यांसह अलिबाग फोटोग्राफर्स असो.च्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमाणपत्र, रोपटे व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. खेलो इंडिया अंतर्गत झालेल्या गतका मार्शल आर्ट क्रिडा प्रकारात अलिबाग तालुक्यातील महाजने येथील श्रमिका श्रीधर पाटील हीने रौप्यपदक मिळवून तालुक्यासह जिल्ह्याचे नाव लौकीक केल्याबद्दल तसेच पोलीस पाटील विकास पाटील यांची रायगड जिल्हापोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.