पेरणीची कामे खोळंबली; पाणीटंचाईचे संकट गडद
| रायगड प्रतिनिधी |
यंदा देशात मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असले तरी रायगड जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मान्सूनचा प्रवास मंदावल्याने जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली असून पावसाअभावी भात पेरणीची कामे खोळंबली आहेत. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून पाणीटंचाईचे संकटही अधिक गडद होत चालले आहे.
हवामान खात्याने मान्सून 10 जूनपर्यंत मुंबई परिसरात दाखल होण्याचा अंदाज वर्तविला होता. मात्र 14 जून उजाडूनही रायगडसह कोकणातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा पाऊस अद्याप पोहोचलेला नाही. केरळ आणि त्यानंतर सिंधुदुर्गात वेळेवर दाखल झालेला मान्सून पुढे सरकताना मंदावल्याने तो सध्या रत्नागिरी परिसरातच थांबलेला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रायगडकरांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असले तरी त्यातून अपेक्षित पाऊस पडत नाही. काही वेळ ढग दाटून येतात, विजांचा कडकडाटही होतो; मात्र त्यानंतर पुन्हा कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वातावरणातील उष्णता आणि आर्द्रता वाढून नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे.
रायगड हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर अवलंबून आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात झाल्यानंतर भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पाऊस लांबल्याने शेतकरी पेरणीसाठी आवश्यक तयारी करूनही प्रत्यक्ष कामे सुरू करू शकलेले नाहीत. पाऊस आणखी उशिरा झाल्यास पेरणीचे वेळापत्रक बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पोलादपूर, महाड, माणगाव, रोहा, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली होती. या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मान्सून आता काही दिवसांत दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी निराश झाले आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनले आहे. अनेक धरणे, तलाव आणि विहिरींमधील जलसाठा कमी झाला असून जिल्ह्यातील शेकडो गावे आजही टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून पावसाचा प्रत्येक दिवस उशिरा होत असल्याने टंचाईची तीव्रता वाढत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांत मान्सूनच्या वाटचालीस पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात लवकरच मान्सून दाखल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत मात्र शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आकाशाकडे लागून राहणार आहे.






