| अलिबाग | प्रतिनिधी |
गेले दोन महिने शांत असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोमवार (दि.15) पासून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू होणार आहे. बालकांना शाळेची आवड निर्माण व्हावी व त्यांची उपस्थिती वाढावी, याकरीता रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबविले जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढावी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल तालुक्यातील वहाळ राजिप शाळेत प्रवेशोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना शालेय प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून सोमवारी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘शाळाप्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची पदयात्रा, पालकांच्या गृहभेटींचे नियोजन करण्यात आले आहे. शाळेचा परिसर ग्रामस्थांच्या सहाय्याने स्वच्छ करून शाळा सडा रांगोळी व पानाफुलांनी सुशोभित करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 3 हजार 58 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांचे रूप पूर्णपणे बदलून गेले आहे. डिजिटल क्लासरूम्स, कृतीयुक्त अध्ययन, विविध खेळ, सहशालेय व अभ्यासपूरक उपक्रम याच बरोबर मुल्य शिक्षणावर विशेष भर, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, 100 टक्के प्रशिक्षित उच्चशिक्षित शिक्षक, तसेच शाळेत विद्याथ्र्यांना मोफत प्रवेश, मोफत गणवेश, मोफत मध्यान्ह भोजन, उपस्थिती भत्ता, शिष्यवृत्ती, संगणक शिक्षण या सुविधांचा लाभ दिला जातो. मुलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यासाठी लोकप्रतिनीधी, सनदी अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी शाळेस भेट देणार आहेत. बालकांची प्रभातफेरी काढण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशित करावे.






