| रसायनी | प्रतिनिधी |
चौक-कर्जत रस्त्यावर बोरगाव जवळ दोन मोटरसायकलस्वारांचा अपघात झाला असून दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला आहे. चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन्ही मृतदेह वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दाखल केले आहेत. सिद्धार्थ जाधव हा चौक दिशेकडून कर्जतकडे जात होता,तर सुजित बोराडे भिसेगांव येथून चौक दिशेला येताना बोरगाव हद्दीत दोन्ही मोटारसायकल समोरासमोर आल्याने एकमेकांना जोरदार धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने त्यांना तात्काळ मदत मिळाली नाही.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार व चौक प्रभारी विशाल पवार यांनी धाव घेतली घेऊन चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चौक प्रभारी विशाल पवार हे करीत आहेत. हा रस्ता रूंदीकरण झाले आहे, मात्र त्यावर दुभाजक नसल्याने दुचाकी स्वार यांना तात्काळ अंदाज येत नाही, मुळात हा रस्ता दोन पदरी की चार पदरी आहे, हेच समजून येत नाही, रस्ता मोठ्या प्रमाणात रुंद आहे. या रस्त्याला दुभाजक का नाहीत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यात असे दुर्दैवी अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोन्ही तरुण घरातील एकुलते एक होते असे समजते. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर मोठा आघात झाला असल्याचे उपस्थित असलेल्या मित्र परिवार यांनी सांगितले.





