| पनवेल | प्रतिनिधी |
यंदा मोरबे धरण परिसरात पूर्वमोसमी पाऊस चांगला झाला. नैऋत्य मोसमी पावसाचे आगमनही लवकर झाले. बुधवारी धरणात एका दिवसात तब्बल 191 मिमी पाऊस कोसळला. परिणामी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पुढील 113 दिवस नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करता येईल एवढा जलसाठा धरणात आहे. याच दिवशी गेल्यावर्षी फक्त 18 मिमी पावसाची नोंद झाली होती.
स्वत:च्या मालकीचे धरण असलेल्या व जलसंपन्न शहर संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईला महापालिकेच्या मोरबे धरणात मागील 3 वर्षांतील सर्वाधिक जलसाठा यंदा शिल्लक आहे. धरणात सद्यस्थितीला 44.46 टक्के जलसाठा शिल्लक असून, पुढील 113 दिवस हे पाणी शहराची तहान भागवणार आहे. पावसाला चांगली सुरुवात झाली असली तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करा असे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. मोरबे धरण गेल्यावर्षी 28 ऑगस्ट 2024 ला 100 टक्के भरले होते. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. दरम्यान, महामुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दिवसेंदिवस अतिशय सुनियोजित असलेल्या शहराचा दर्जा आणखी वाढत जाऊ लागला आहे. परंतु, नवी मुंबई महापालिकेच्या लोकसंख्येच्या मानाने धरणातून अधिक पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे पालिकेने पाणी उपशावर ही नियंत्रण ठेवण्याची खूप आवश्यकता आहे.
धरणातील पाणीस्थिती
शिल्लक पाणीसाठा - 44.46 टक्के
धरण पातळी - 75.37 मीटर
मोरबे धरणक्षेत्रात गेल्यावर्षी पेक्षा चांगला पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले होते. यंदाही धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत धरणात अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाही धरण 100 टक्के भरेल अशी आशा आहे.
अरविंद शिंदे,
अतिरिक्त शहर अभियंता,
मोरबे प्रकल्प






