मोकाट जनावरे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचा ढिसाळपणा उघड
| रोहा | वार्ताहर |
गोमातेला माता मानणाऱ्या समाजात, तिचेच रक्षण करण्याची जबाबदारी कोणीच घेत नाही, हे वास्तव सध्या गोफण व कुंभोशी परिसरात दिसून येते. येथील रस्त्यावर मोकाट व बेवारस गुरांचा सुळसुळाट झाला असून, या गुरांसह वाहनचालकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका सुरू असतानाही स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जनसामान्यांच्यात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
चणेरा-गोफण ते कुंभोशी दरम्यान रस्त्यांवर कळपाने गायी, बैल व वासरे मोकाट फिरताना दिसत आहेत. विशेषतः बेवारस गायी ठिकठिकाणी रस्त्यावर ठिय्या मारून बसतात. त्यामुळे वाहनचालकांना अर्ध्या रस्तावरून गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यादरम्यान वाहतूक कोंडीचाही सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच, कुंभोशी परिसरात वीस-पंचवीस गायींचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसतात. त्यातील अनेक गायी बेवारस असून, त्यांचे कोणीही मालकी हक्क सांगत नाही. रात्रीच्या वेळी पथदीप नसल्याने वाहनचालकांना हे जनावरे दिसतच नाहीत. परीणामी कलपांना धडकण्याचे प्रकार घडत असून, जीवितहानीची शक्यता दिवसेंदिवस वाढते आहे. परंतु, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांच्याकडून डोळेझाक होत असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे ‘गोमाता’ म्हणणे सोपे आहे; परंतु, तिचे रस्त्यावर मरण येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे समाजाचे, प्रशासनाचे व प्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मोकाट व बेवारस जनावरांमुळे निर्माण झालेला जीवघेणा धोका तात्काळ दूर करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रशासन, प्रतिनिधी गप्प
मोकाट जनावरांचे मालक सहजतेने आपली गुरे रस्त्यावर सोडून मोकळे होतात. काही प्रकरणांत जनावरे बेवारस असून, त्यांच्यावर देखरेखीची कोणतीही व्यवस्था नाही. मात्र, प्रशासन अशा बेजबाबदार मालकांवर कारवाई करत नाही. नागरिकांच्या सातत्याने तक्रारी असूनही ग्रामपंचायत व पोलीस विभाग यावर कोणतीही ठोस कारवाई करत नाहर. लोकप्रतिनिधीही बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे समस्या दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे.






