158 मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यास यश
| अलिबाग | प्रमोद जाधव |
मोबाईल हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे मोबाईल चोरी होण्याबरोबरच गहाळ झाल्यास मोबाईल वापरकर्ते नाराज होतात. तक्रार करूनही पुन्हा मोबाईल भेटणे कठीण असते. आता मात्र हरवलेल्या व चोरीला गेल्या मोबाईलच्या मागावर सीईआयआर प्रणाली आहे. केंद्र सरकारमार्फत ही प्रणाली कार्यान्वीत केली असून, या प्रणालीच्या माध्यमातून खोपोलीमधील 158 मोबाईल नागरिकांना परत देण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे.
मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहेत. वेगवेगळ्या स्कीम, फायनान्सवर मोबाईल ग्राहकांना मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह धनदांडग्यांच्या पसंतीचे मोबाईल खरेदी केले जात आहेत. डिजीटल शिक्षणामुळे मोबाईलद्वारे शिक्षण घेण्याची पध्दत वाढली आहे. मोबाईलमधील वेगवेगळ्या ॲपद्वारे ऑनलाईन खरेदीसह आर्थिक देवाण घेवाणीचा विषयही मोबाईलद्वारे मोठ्या प्रमाणात होतो.
मात्र, मोबाईल चोरीबरोबर गहाळ होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ही एक मोठी समस्या बनली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करूनही मोबाईल लवकर मिळत नसल्याची ओरड नागरिकांची कायम राहिली आहे. परंतु या समस्येवर समाधान देणारी सीईआयआर प्रणाली केंद्र सरकारने कार्यान्वित केली आहे. ही प्रणाली 24 तास सूरू असून मोबाईल गाहळ व चोरीला झाल्यास या प्रणालीमार्फत तात्काळ शोध लागण्यास मदत होत आहे. सेंट्रल इक्वीपमेंट आयडेन्टीटी रजिस्टर (सीईआयआर) या प्रणालीच्या मदतीने रायगड पोलीस दलातील खोपोली येथील 158 मोबाईल ग्राहकांना परत मिळवून देण्यास यश आले आहे. 2023 ते 2025 या कालावधीत गहाळ झालेल्या महागड्या मोबाईलपैकी 110 आणि 48 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून नागरिकांना ते मोबाईल परत करण्यात आले आहेत.
सेंट्रल इक्वीपमेंट आयडेन्टीटी रजिस्टर (सीईआयआर) ही केंद्र सरकारमार्फत प्रणाली सूरू केली आहे.गहाळ झालेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा ठावठिकाणी शोधून काढण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरत आहे. खोपोली पोलिसानी या प्रणालीचा वापर करीत 158 मोबाईल ग्राहकांना परत मिळवून दिले आहे. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यात या प्रणालीद्वारे कार्यवाही करून गहाळ व चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
आंचल दलाल
पोलीस अधीक्षक, रायगड
अलिबाग







