| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
अरण्यॠषी मारूती चित्तमपल्ली यांच्या संस्मरणीय निसर्ग कार्याला समर्पित वृक्षारोपण तथा वृक्ष संवर्धन उपक्रमाच्या अनुषंगाने अलिबाग वनविभागातर्फे ‘माझे वन माझी जबाबदारी’ ही मोहिम राबवित आहे. या मोहिमेची सुरूवात रविवारी (दि.29) नागाव परिमंडळातील चौल येथील भोवाळे घूमट परिसरात तीन एकर वनजमीनीवर 400 रोपे लावून करण्यात आली. या वृक्षारोपणाला चौल येथील निसर्ग प्रेमी संस्था, ओएसिस बहुउद्देशीय समाजभिमुख संस्था, चौल कृषक कल्याणकारी संस्था, भोवाळे ग्रामस्थ व भगवती ग्रुप यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी निसर्ग विलीन अरण्यॠषी मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मोहिमेत परिमंडळ अधिकारी प्रभाकर भोईर, नियतक्षेत्र अधिकारी चौल एम.डी. तायडे, नियतक्षेत्र अधिकारी नागाव उदय हटवार तसेच स्थानिक ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी, पर्यटक व स्थानिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच, मंगळवारी (दि.1) सेंट मेरी हायस्कूलचे 100 विद्यार्थी व शिक्षक या मोहीमेत भाग घेऊन वनमोहत्सव साजरा करण्याचे नियोजित करण्यात आल्याचे नियतक्षेत्र अधिकारी चौल एम.डी. तायडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.






