| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागडातील पाच्छापूर व दुबेवाडी रस्ता सध्या अक्षरशः मृत्यू पंथावर आहे. रस्त्याची दयनीय अवस्था, मोठंमोठे दगड, खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य हे चित्र पाहून संबंधित प्रशासनाच्या नाकर्तेपणाची प्रचिती येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी धावपळ केली, निवेदने दिली, तक्रारी दाखल केल्या. परंतु, प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण, नागरिकांचे आरोग्य व महिलांचा सुरक्षित प्रवास सारे काही धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आले असून लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी एकजूट दाखवत आहेत. हा केवळ प्रवासाचा प्रश्न नाही, तर ग्रामस्थांच्या हक्कांचा आणि जगण्याच्या अधिकाराचा लढा असल्याचे बोलले जात आहे. जर, प्रशासनाने आता देखील याकडे दुर्लक्ष केले, तर गावकऱ्यांचा संघर्ष रस्त्यावर उतरेल, असा ठाम निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे. हक्काची मागणी शांतपणे केली जात आहे, मात्र ती दुर्लक्षित राहिली तर तीव्र आंदोलन करावे लागेल, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.







