| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण या मार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड हॉस्पिटल गेटच्या पुढील बाजूस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी पूर्वी पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी मोऱ्या पाण्याचे वाहून जाण्याचे मार्ग टाकण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम करताना या मोऱ्या बंद केल्याचे समोर आले आहे. परिणामी समोरील डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला निचऱ्याचा मार्ग उपलब्ध नसल्याने ते थेट रस्त्यावर साचत आहे.
रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने अतिशय सावधगिरीने चालवावी लागत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी लक्षात न आल्याने अपघात होण्याचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत असून, एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिकांनी व वाहनचालकांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तेथील मोरी खुली करून पाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.






