पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील पेढांबे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांच्या मुलाचा प्रताप समोर उघड झाला आहे. आपल्या आईच्या सरपंच पदाचा गैरवापर करीत एका विकासकाच्या कामात अडकाठी करून देखरेख ठेवणाऱ्या शिवीगाळी व दमदाटी दिल्याचा प्रकार घडला. ही घटना शनिवारी सकाळी केतकीचा मळा येथे घडली असून, याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिंदे गटातील सरपंच यांच्या मुलांच्या या गुंडगिरीबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
विजय गायकवाड हे गुप्ता यांच्या मिळकतीवर देखरेखीचे काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, उमेश गुप्ता यांनी सुमारे चार एकर जमीन विकत घेतली आहे. ही जागा डोंगर माथ्यावर आहे. या जागेत विकासकामार्फत काम केली जात आहेत. गेल्या दोन वर्षापासून काम सूरू आहे. या जागेत खडी, डबर आदी साहित्यांची ने आण सुरू आहे. 26 जून रोजी उमेश गुप्ता यांच्या मालकीच्या जागेत कंटेनर ठेवण्यासाठी ट्रेलरमधून आणले होते. ते ट्रेलर उतरविण्यासाठी गायकवाड यांनी वडखळमधून भाड्याने हायड्रा मागविला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हायड्रा वरती घेऊन गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील शिवसेच्या पेढांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांचा मुलगा रोहित पाटील व त्याचा सहकारी स्वरुप पाटील तसेच अन्य तिघेजण गुप्ता यांच्या मालकीच्या जागेच्या ठिकाणी एकत्र आले. त्यांनी त्यांच्याकडील चारचाकी वाहन रस्त्यात उभे करून जाण्या येण्याचा रस्ता अडविला. यावेळी विजय गायकवाड आणि रोहित पाटील यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाले. गायकवाड यांना शिवीगाळी करण्याबरोबरच दमदाटी देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरपंच यांच्या मुलाच्या या गुंडगिरीविरोधात पोयनाड पोलीस ठाण्यात विजय गायकवाड यांनी तक्रार केली असल्याची माहिती देण्यात आली आहे.







