| मुंबई | प्रतिनिधी |
यशस्वी जैस्वालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. 23 वर्षीय यशस्वीने काही महिन्यांपूर्वी गोवा संघाकडून खेळण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. मात्र, त्यानंतर त्याने माघार घेतली आणि एमसीएला त्याची विनंती मान्य करू नका, असे म्हटले आहे. सोमवारी एमसीएने ही मागणी मान्य केली आणि आता यशस्वी मुंबईकडूनच खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपेक्स कौन्सिलने यशस्वी जैस्वाल याने दुसऱ्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मागितलेले ना हरकत प्रमाणपत्र मागे घेण्यास मान्यता दिली आहे. तो मुंबईसाठी उपलब्ध राहणार आहे, असे एमसीएने एका निवेदनात म्हटले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, यशस्वी हा नेहमीच मुंबई क्रिकेटचा अभिमानास्पद खेळाडू आहे. आम्ही त्याचा ना हरकत दाखला मागे घेण्याचा अर्ज स्वीकारला आहे आणि तो आगामी स्थानिक हंगामात मुंबईसाठी उपलब्ध असणार आहे.