सरपंच व उपसरपंचांच्या खुर्चीवर बसण्यापासून निर्णय प्रक्रियेत सहभाग
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाले, मात्र निवडून आलेल्या महिलांच्या जागी त्यांचे पतीदेवच कारभार हाताळताना दिसत आहेत. त्यामुळे नेमकं सरपंच कोण? असा संभ्रम अनेक ठिकाणी दिसून येतो. सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये याचा प्रत्यय आला आहे.
सरपंचांचे पती कारभारात हस्तक्षेप करत असून, सरपंच व उपसरपंचांच्या खुर्चीवर बसण्यापासून निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. तसेच आर्थिक लाभही घेत आहेत, अशी लेखी तक्रार कोकण विभागीय आयुक्त यांना येथील ग्रामस्थांनी व एका ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे. तसेच संबंधित व्हिडीओ व छायाचित्रदेखील काढले आहेत.
ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, 5/11/2023 रोजी पाच्छापूर ग्रुप ग्रामपंचायतीची निवडणूक पार पाडून दि. 6/11/2023 रोजी सुधारित बदलानुसार सरपंचाची थेट नेमणूक होऊन उत्कर्षा रोशन बेलोसे या सरपंच झाल्या. त्यानंतर सरपंच उत्कर्षा यांचे पती रोशन बेलोसे वारंवार ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजात भाग घेणे, हस्तक्षेप करणे तसेच ग्रामपंचायतीमध्ये येऊन ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात नसताना सरपंचाच्या खुर्चीवर बसणे तसेच उपसरपंचांच्या खुर्चीवर बसणे, वारंवार सरपंच यांच्या दालनामध्ये बसणे व ग्रामपंचायत अधिकारी कार्यालयात नसताना ग्रामपंचायतीचे दप्तर हातात घेणे व त्याचे फोटो काढणे तसेच झेरॉक्स काढून व घेऊन जाणे यासारखे प्रकार करीत आहेत.
उत्कर्षा रोशन बेलोसे या सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर ज्या ज्या वेळी सदस्यांची मासिक मीटिंग भरवली जाते, त्या त्या वेळी त्यांचे पती रोशन बेलोसे हे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन बसतात व मासिक सभा संपताच सर्व सदस्यांसह सरपंचांच्या दालनात बसतात. शिवाय, मासिक सभेत जे जे ठराव घेतले जातात, त्यामध्ये वारंवार हस्तक्षेप करतात, त्यामुळे सरपंच यांचे पती रोशन बेलोसे यांची ग्रामपंचायतीच्या कामकाजातील हस्तक्षेपाबाबत चौकशी करण्यात यावी. तसेच सरपंचावर गैरवर्तणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आर्थिक लाभ
सरपंचांचे पती रोशन बेलोसे हे ग्रामपंचायत अंतर्गत स्वत: अनेक निकृष्ट दर्जाची कामे करून त्यांची बिले काढून ग्रामपंचायतीकडून व्यक्तीश: आर्थिक लाभ घेत आहेत. त्यास सरपंचांचा पाठिंबा असून, अशा प्रकारे सरपंच हे ग्रामपंचायतींच्या कामातून पतीद्वारे आर्थिक लाभ मिळवत असल्याने शासनाची फसवणूक करीत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने पाछापूर ग्रामपंचायत प्रकरणात विस्तार अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून अहवाल तयार केला जाणार आहे. पुढील कार्यवाहीसाठी अलिबाग येथील वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाणार आहे.
लता मोहिते,
गटविकास अधिकारी, पाली-सुधागड







