अलिबाग | प्रतिनिधी |
रेवस बंदराजवळ खाडी किनारी श्री समर्थ कृपा बोटीमध्ये असलेला अवैध डिझेलचा साठा मांडवा सागरी पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा समावेश असून, बार्जवरील खलाशांशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून कमी किमतीमध्ये रोखीने डिझेल तस्करी करीत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
बोडणी येथील गणेश कोळी हा या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आहे. डिझेल तस्करीमध्ये आणखी विनायक कोळी, मोरेश नाखवा, विरेन मुकेश निषाद, लक्ष्मण, तसेच सागर प्राईड बोटीवरील खलाशी यांचा समावेश असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. यातील दोघेजण परप्रांतीय असून, एकजण मुंबई येथील रहिवासी आहे.
समुद्रामध्ये मालवाहतूक करणाऱ्या सागर सिरीजचे मोठे जहाज (बार्ज) यांना ही मंडळी सोशल मीडियाचा वापर करीत ‘फाईंड शिप’ नावाच्या ॲपद्वारे शोधतात. बार्जमधील कामगार वगळता इतर व्यक्तीशी संपर्क सोशल मीडियाद्वारे (व्हॉट्सॲप) संपर्क साधतात. त्यानंतर बोटीतील डिझेल कमी किमतीने रोखीत विकत घेतात. हा प्रकार उघड होऊ नये, म्हणून बोटीतील कामगारांना मोबाईल व इतर किमती वस्तू भेट देतात, असा प्रकार तपासादरम्यान उघड झाला आहे.
पोलिसांची धडक कारवाई
पोलिसांनी केलेल्या कारवाईत बोटीतील इंजिनच्या खोलीच्या मागील तीन खनांमध्ये तसेच मोकळ्या जागेत पाणीमिश्रित पाच हजार लीटर असा चार लाख रुपयांचा डिझेलचा साठा, पंधरा हजारांचा होंडा कंपनीचा जनरेटर, द्रव पदार्थ उपसा करणारी पंधरा हजारांची मोटार, दहा लाख रुपयांची मासेमारीची बोट तसेच मोरेश्वर नाखवा यांच्या नावे असलेले विविध कागदपत्रे या बोटीत सापडले. एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, मुख्य सूत्रधार गणेश कोळी याला अटक केले आहे. ही कारवाई मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.







