। पालघर । प्रतिनिधी ।
भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी शुक्रवारी (दि. 25)ऑरेंज अलर्ट व शनिवारी (दि. 26) अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा आणि महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी सुरू असून येत्या 24 तासांत काही ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. शुक्रवार दुपारपासून तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.
26 जुलै रोजी पावसाचे प्रमाण वाढून तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. 27 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून 28 जुलैपासून पावसाचे प्रमाण कमी होऊन मध्यम स्वरूपात पाऊस राहील, असे जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडने कळवले आहे.
तसेच, नागरिकांनी सतर्क राहावे, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, 26 जुलै रोजी अंगणवाड्या, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी असेल. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.







