कारचालकाला न्यायालयीन कोठडी
| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथील हिरानंदानी उड्डाणपुलावर 9 जुलै रोजी पहाटे घडलेल्या अपघातातील गंभीर जखमी तरुणांपैकी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढली आहे. या अपघातानंतर फरार झालेला कारचालक वैभव डेरे (24) याच्याविरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या अपघातातील मृत व जखमी तरुण मुंबईतील धारावी येथे राहणारे असून, ते डान्स ग्रुपमध्ये काम करत होते. 8 जुलैच्या मध्यरात्री 6 दुचाकीवरून लोणावळ्याला फिरण्यासाठी जात असताना 9 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ते खारघर येथील हिरानंदानी उड्डाणपुलावर पोहोचले असताना, पाठीमागून वेगाने आलेल्या कारने सुरुवातीला मानव कुंचीकोरवे याच्या स्कुटीला धडक दिली. या घटनेत तो पुलावरून खाली फेकला गेला. त्यानंतर या कारने या तरुणांच्या इतर चार दुचाकींनाही धडक दिली. या अपघातानंतर चालक कार घटनास्थळी सोडून तेथून फरार झाला होता.
या अपघातातील सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, यात गंभीर जखमी झालेल्या मानव कुंचीकोरवे (22) याचा मृत्यू झाला. तर सुभान शेख, इस्तियाक अन्सारी, नवीन रावा, महेश गड्ढे, संकेत सिंग, साहील कुंचीकोरवे, मुकुल उर्फ लकी कोळी, आशिषकुमार शाहु तसेच सागर देवल्ला व समीर मोहम्मद यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील सागर देवल्ला व समीर मोहम्मद यांचाही मृत्यू झाला आहे.
या अपघातानंतर पळून गेलेला कारचालक वैभव डेरे याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.







